Wednesday, April 13, 2011

वेश्यांच्या पुनर्वसनासाठी आंध्रप्रदेशचे अनुकरण महाराष्ट्राने करावे - भागवत

वेश्यांच्या पुनर्वसनासाठी आंध्रप्रदेशचे अनुकरण महाराष्ट्राने करावे - भागवत
नगर, २७ मार्च/प्रतिनिधी
मागील ५ वर्षांत आंध्रप्रदेशने महिला व बालकांच्या अनैतिक वाहतुकीस प्रभावी प्रतिबंध केला आहे. वेश्या व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने इच्छाशक्ती दाखवून विविध सरकारी विभागांमध्ये समन्वय निर्माण केला. याबाबतीत आंध्रप्रदेशचे अनुकरण महाराष्ट्राने करायला हवे, असे मत आंध्रप्रदेशातील पोलीस उपमहानिरीक्षक व नगरचे सुपुत्र महेश भागवत यांनी केले.
स्नेहालय परिवारातर्फे श्री. भागवत यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नगर जिल्ह्य़ातील ३ हजार शोषित महिलांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. या पाश्र्वभूमीवर श्री. भागवत यांनी या शोषित महिलांशी संवाद साधला. स्नेहालयच्या विश्वस्त मीनाताई शिंदे, संगीता शेलार, हसीना शेख यांनी महिलांच्या व्यथा मांडल्या. पोलिसांकडून जिल्ह्य़ातील २४०० महिलांवर वारंवार गुन्हे दाखल केले गेल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे. पर्यायी रोजगार नाही, हक्काची जागा नाही यामुळे अनेक महिलांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद, बीड व मुंबईकडे पलायन केले आहे. त्यामुळे या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण, बचतगट चळवळ अडचणीत आली आहे.
श्री. भागवत यांनी आंध्रप्रदेशमध्ये वेश्यांच्या पुनर्वसनासाठी राबवलेल्या ‘आसरा’ प्रकल्पाची माहिती दिली. आंध्रमध्ये कायद्याचा दंडुका वेश्यांवर नव्हे तर कुंटणखाना चालक, मालक, दलाल, ग्राहक यांच्यावर उगारला जातो, असे सांगून ते म्हणाले की, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यातील कलम ७ व ८ देहव्यापारातील बळी महिलांना अकारण गुन्हेगार ठरवतात. या कलमानुसार सार्वजनिक ठिकाणी देहव्यापार करणे प्रतिबंधित आहे. परंतु या दोन कलमांमुळे शोषित महिला पुन्हा दलालांच्या गुलामीत पडतात. त्यामुळे आंध्रप्रदेशने या कलमांचा वापर बंद करून वेश्यांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्रात मात्र या दोन कलमांचा वापर होत असल्याने महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. या संदर्भात धोरण बदलवण्यासाठी राज्य सरकारशी संवाद साधावा लागेल.
आंध्रप्रदेशमध्ये सुटका केलेल्या मुली व महिलांना वेलकम कीट व रोख ५ हजार रूपये त्वरित दिले जातात. त्यामुळे पोलीस कारवाईनंतरची लाचारी व भीती टळते. अनेक महिलांच्या पुनर्वसनाचे अनुभव त्यांनी सांगितले. स्नेहालयाच्या अनेक प्रकल्पांना श्री. भागवत यांनी भेट दिली

1 comment:

Unknown said...

Women and children have been victims of sex trafficking for thousands of years. It is considered as a modern-day form of slavery. Thousand of young boys and girls are trafficked every year.
I would like to suggest a documentary relating to this article, "Prostitution Enforced by Tradition" it shows the the dark side of ancient traditions and how women are forced into prostitution in the name of tradition.
To watch this documentary online visit
http://www.cultureunplugged.com/play/5039