Saturday, November 27, 2010

Trafficking by cheating victims in the name of marriage

विवाहानंतर त्याने विकले ६० पत्नींना..!


सिलिगुडी - पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात, एका व्यक्तीने चक्क ६० विवाह केले आणि विवाहानंतर थोड्याच काळात तो पत्नीला कुंटणखान्यात विकून टाकत होता. लष्करातील जवान असल्याची बतावणी करून त्याने हे विवाह केले होते. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दार्जिलिंग जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक देवेंद्रप्रताप सिंह म्हणाले, की विकी ऊर्फ विश्वकर्मा असे या तरुणाचे नाव असून, त्याने विवाहानंतर मुंबई आणि पुण्यातील कुंटणखान्यांमध्ये स्वतःच्या पत्नीची विक्री करत असे. विश्वकर्मा याच्यासह त्याची साथीदार महिलेलाही अटक करण्यात आली आहे.
एका स्वयंसेवी संस्थेतील व्यक्तीने पोलिसांना विश्वकर्मा याची माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी ही कारवाई केली. सिंह म्हणाले, की त्याची साथीदार महिला, गरीब आणि गरजू महिलेस हेरून तिच्या घरी जात असे आणि विश्वकर्मा हा चांगल्या घराण्यातील तरुण आहे. त्याची सांपत्तिक स्थितीही चांगली आहे. त्याच्याशी विवाह केल्यास कल्याण होईल, अशी बतावणी करत असे. विवाहानंतर तो मुंबई-पुण्याला जाऊन पत्नीला विकून येत असे.

Tuesday, November 23, 2010

‘लैंगिक व्यापाराला प्रतिबंधासाठी सकारात्मकता दाखवा’

आंध्रचे उपमहानिरीक्षक भागवत यांचे नगरच्या पोलिसांना आवाहन
नगर, २१ नोव्हेंबर/प्रतिनिधी
लैंगिक व्यापारासाठी अल्पवयीन मुलींचा वापर ही मानवी जीवनाला काळे फासणारी घटना आहे. अशा कृत्यांना कधीही पाठिशी घालू नये. थोडी सकारात्मकता दाखवली, तर अशा गुन्ह्य़ांचा शोध घेणे व गुन्हेगारांना शिक्षा होणे हे पोलिसांसाठी सहज शक्य आहे, असे प्रतिपादन मूळचे पाथर्डीचे रहिवासी व सध्या आंध्र प्रदेशात पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी केले.नक्षलवादी कारवायांमध्ये असामान्य शौर्य दाखवलेले, तसेच लैंगिक व्यापारात गुंतलेल्या आंध्र प्रदेशातील टोळ्यांना जेरबंद करणारे भागवत खासगी कामासाठी पाथर्डीला आले होते. जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी जिल्ह्य़ातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी नियोजन भवन सभागृहात त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश, अतिरिक्त जिल्हाधिकारी नानासाहेब बोठे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. भागवत यांनी आंध्र प्रदेशात केलेल्या विविध कारवायांची विस्ताराने माहिती देत पोलिसांना अन्यायग्रस्तांसाठी नेहमीच धावून जाण्याचे आवाहन केले. कायदे सगळे चांगलेच आहेत, मात्र त्याचा व्यवस्थित वापर करून घेण्यात आपणच कमी पडतो, असे आपले निरीक्षण असल्याचे ते म्हणाले. काही कारवायांमध्ये, विशेषत: अंमली पदार्थ किंवा लैंगिक शोषणाच्या गुन्ह्य़ांमध्ये तपास सुरू असतानाच प्रेशर ग्रुप म्हणजे दबाव गट तयार होतात हे खरे आहे. मात्र, त्याला बळी पडण्याचे कारण नाही. थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या दबाव गटांचा सामना करता येतो, असे ते म्हणाले.कायद्याने पोलीस, तसेच महसूल अधिकाऱ्यांना अनेक अधिकार दिले आहेत. कला केंद्र, तसेच लॉजवर अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे, असे आढळल्यास संबंधित लॉज, कला केद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे अधिकार प्रांत स्तरावर आहेत. मात्र, पोलिसांनी तसा प्रस्ताव तयार करून प्रांत कार्यालयाकडे पाठवला पाहिजे. नेमक्या याच गोष्टी होत नाहीत व एकाच लॉजवर वारंवार छापा टाकल्याच्या बातम्या येत राहतात. पोलीस व प्रशासनाने काही गोष्टी हातात हात घालून समन्वयाने केल्या तर गुन्हेगारीला आळा घालणे मुळीच अवघड नाही, असे भागवत यांनी सांगितले.लैंगिक व्यापारात गुंतलेल्या गुन्हेगारांवर कारवाई झाली, तरी त्यातील अत्याचारित मुलींच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. ते काही आमचे काम नाही, असे न म्हणता पोलीसही त्यात सहभागी झाले तर फार मोठा परिणाम होतो, अत्याचारग्रस्तांना मानसिक उभारी मिळते, असे स्पष्ट करून भागवत यांनी त्यांना आंध्र प्रदेशात केलेल्या कामांची माहिती दिली. परदेशातील, तसेच परराज्यांतील मुलींना यशस्वीपणे त्यांच्या मूळच्या घरी पाठवून त्यांचे पुनर्वसन केलेली अनेक उदाहरणे त्यांनी दिली. या कामासाठी भागवत यांना राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यातील अनेक कलमांची भागवत यांनी माहिती दिली व त्याचा प्रभावीपणे कसा वापर करता येतो तेही स्पष्ट केले. आपल्या विविध कामांच्या चित्रपारदर्शिकाही त्यांनी दाखवल्या. गुन्हेगाराला कडक शिक्षा होईल याच आत्मविश्वासाने पोलिसांनी काम करावे. तसे होत नाही व त्यामुळेच आमचे काही बिघडत नाही असा उद्दामपणा गुन्हेगारांमध्ये येतो. शिक्षेची जरब बसली, तर मात्र गुन्हा करताना त्यांना शंभरवेळा विचार करावा लागेल, असे भागवत म्हणाले. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या शंकांनाही त्यांनी उत्तरे दिली.कृष्णप्रकाश यांनी भागवत यांच्या कामाची मुक्तकंठाने स्तुती करीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. जिल्ह्य़ात गेल्या काही महिन्यांत कारवाई केलेल्या अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांची त्यांनी माहिती दिली. कायद्याचा व्यवस्थित वापर हेच पोलिसांच्या कामाचे मुख्य सूत्र आहे, असे ते म्हणाले. डॉ. अन्बलगन म्हणाले, जिल्ह्य़ातून अनेक राज्यांच्या मालमोटारींची ये-जा सातत्याने सुरू असते. १० ते १२ माणसे बसू शकतील अशा ढाब्यांवर रोज ५०पेक्षा अधिक मालमोटारी लागलेल्या असतात. लहानसेच गाव असते, मात्र तिथे एकापेक्षा अधिक लॉज असतात. ही गुन्हेगारीची केंद्र असताना त्याकडे पोलिसांचे हवे तसे लक्ष नसते. अतिरिक्त जिल्हाधिकारी बोठे यांनी आभार मानले.
अत्याचारग्रस्तांसाठी विशेष कक्ष - डॉ. अन्बलगनआपण आल्यापासून एकाही कलाकेंद्राला परवानगी दिली नसल्याचे डॉ. अन्बलगन यांनी सांगितले. एका प्रकरणात आपल्याला संबंधितांनी समुद्रगुप्तापासूनच्या इतिहासाचा हवाला देत परवानगी द्या म्हणून दबाव आणला होता, अशी माहिती देत आपण परवानगी तर नाकारलीच, पण त्याला चंद्रगुप्त मौर्यापासूनच्या इतिहासाचीही माहिती दिली, असे ते म्हणाले. जिल्ह्य़ात लवकरच अशा प्रकारच्या अत्याचारात सापडलेल्यांसाठी एक विशेष स्वरूपाचा कक्ष सुरू करीत आहोत. त्यासाठी स्नेहालयसारख्या प्रकल्पांची मदत घेतली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.