Thursday, September 30, 2010

‘पुनर्वसन झाल्यास देहव्यापारातील महिलांचे भविष्य सुरक्षित बनेल’

नगर, २९ सप्टेंबर/प्रतिनिधीपुनर्वसन झाल्यास देहव्यापारातील शोषित महिलांचे भविष्य सुरक्षित बनू शके ल, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केले. स्नेहालयने आयोजित केलेल्या जिल्ह्य़ातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
गेल्या काही महिन्यांत जिल्ह्य़ातील अनेक कुंटणखान्यांवर पोलिसांनी घातलेल्या छाप्यांमुळे अनैतिक मानवी व्यापाराला मोठा आळा बसला आहे. मात्र, त्यामुळे देहव्यापारातील महिलांच्या चरितार्थाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात हा मेळावा घेण्यात आला. त्याचा समारोप कृष्णप्रकाश यांच्या उपस्थितीत झाला. स्नेहालयचे विश्वस्त श्याम असावा, मिलिंद कुलकर्णी, मीनाताई िशदे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.  महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. पुनर्वसनासाठी आंध्रप्रदेशात हक्काची जागा आणि रोजगार प्रशासनाकडून दिला जातो. महाराष्ट्रात मात्र सरकारने एक चौरस फूट जागा किंवा एक रुपयाचे अनुदानही दिलेले नाही, असे शेवगावच्या स्नेहज्योत प्रकल्पाच्या संघटक जया जोगदंड म्हणाल्या. श्रीरामपूर येथील सुनीता उनवणे म्हणाल्या, पुनर्वसनाचा कोणताही पर्याय समोर नसल्याने पोलीस कारवाई होताच महिलांना घरे-दारे सोडून परजिल्ह्य़ात पळून जावे लागते. आम्ही गाव सोडावे की धंदा, हे पोलीस अधीक्षकांनी सांगावे. बहुतांशी महिला कर्जबाजारी झाल्या असून अनेकजणींना उपचार अर्धवट सोडावे लागले आहेत, असे नगरच्या सुमन त्रिभुवन यांनी सांगितले.
कृष्णप्रकाश म्हणाले, उपजिविकेसाठी स्वत:चे शरीर विकणे हा गुन्हा नसला, तरी कुंटणखाने चालवणे, तसेच दुसऱ्या महिलांची कमाई खाणे हे अनैतिक मानवी वाहतूक कायद्यानुसार गंभीर गुन्हे आहेत. विविध ‘अर्थ’पूर्ण कारणांमुळे आजवर या धंद्यातील खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई होत नव्हती. ही कारवाई सुरूच राहिल. त्यामुळे या धंद्यातील महिलांनी धाडस करून पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारावा. या संदर्भात स्नेहालयचा पुढाकार ऐतिहासिक महत्त्वाचा आहे.  पुनर्वसनासाठी शेती, दुग्ध व्यवसाय, हस्तकला या रोजगारक्षम उद्योगांसाठी सरकारने किमान ६७ हेक्टर पडीक जमीन संस्थेला द्यावी, असा ठराव महिलांनी केला. जागा मिळाल्यास पुनर्वसनाचा पथदर्शी प्रकल्प स्नेहालय उभारेल, असे स्नेहज्योतचे समन्वयक प्रवीण मुत्याल यांनी सांगितले.      

स्नेहालय पुनर्वसन प्रकल्पात मोफत जागा
पुनर्वसनासाठी स्नेहालयने ठोस पुढाकार घेतला आहे. ज्या महिला लालबत्ती भागातून स्नेहालय प्रकल्पात राहण्यासाठी येतील, त्यांना प्रत्येकी १ हजार चौरस फूट जागा संस्था पुनर्वसन संकुलात देईल. वीज, पाणी व रोजगाराचे साधन संस्था पुरवेल. भोजन, औषधोपचाराचा खर्चही केला जाईल. सलग ३ महिने राहणाऱ्या महिलांना ही जागा करार करून मोफत दिली जाईल, असे मिलिंद कुलकर्णी यांनी जाहीर केले. पहिल्या टप्प्यात ४० महिलांना त्यांच्या मुलाबाळांसह पुनर्वसित करण्याचा मानस आहे, असे संस्थेचे उपसंचालक अंबादास चव्हाण यांनी सांगितले. कृष्णप्रकाश यांच्या हस्ते मालन गोरे व मीना पाठक यांना २ भूखंड प्रदान करून प्रकल्पाला सुरुवातही करण्यात आली.

No comments: